औरंगाबाद: शिवसेनेने हिंदुत्वाच्या नावाने खूप राजकारण केले. आतापर्यंत ते याच मुद्द्यावर निवडणूका जिंकत आले आहेत. आता मात्र त्यांनी हिंदुत्वाचा राजकारण बंद करावे. ज्या हिंदूंच्या बळावर ते आतापर्यंत निवडणूका जिंकत आले त्या हिंदूना त्यांनी आधी पाणी पाजावे असा टोला जलील यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच, महापालिका म्हणजे महापौर यांची जहागीर नाही. त्यांनी तसे समजू नये. महापालिकेतील एकेक घोटाळा मी अधिवेशन संपल्यावर बाहेर काढणार आहे असं जलील यांनी म्हटलं आहे. सुभेदारी विश्रामगृह येथे एमआयएमने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तर महापौरांना झोप लागणार नाही..!
औरंगाबाद महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाअसुन आजची माहिती हा केवळ ट्रेलर आहे. खरा पिक्चर आपण अधिवेशन संपल्यानंतर दाखवणार असे ते यावेळी म्हणाले. हा एक महिना महापौर माझं नाव घेतल्याशिवाय झोपणार सुद्धा नाही एव्हढी त्यांना इम्तियाज जलीलची भिती वाटेल असे जलील यांनी म्हटले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी कोणत्या गोष्टीवर किती रूपये खर्च केले याची एका वर्षाची आकडेवारीदेखील जलील यांनी जाहीर केली आहे.
महापौर दालनातील चहापान - ४ लाख ६८ हजार
फुल,हार आणि बुके - १ लाख ११ हजार ७५०
विविध कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ - २० लाख
विविध दौऱ्यावरील खर्च - १ लाख ९ हजार ८३०
महापौर बंगल्यावर झालेला खर्च - १० लाख ४२ हजार ८७२
सामनामधील अग्रलेख म्हणजे निव्वळ मनोरंजन
शिवसेनेने सामाना पेपरमध्ये छापलेल्या अग्रलेखाविषयी विचारले असता, सामना मधील लेख म्हणजे केवळ मनोरंजन असुन त्याला कोणीही सिरीयसली घेत नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील असेच विधान यापूर्वी केले आहे. त्यामुळे सामाना मध्ये काय छापून आले याला महत्व देण्याची गरज नसल्याचे जलील यांनी म्हटले आहे.
अफरसखान सारख्या छोट्या मनाचा माणूस
कांग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही. तो खूप छोट्या मनाचा माणूस आहे. मात्र, त्याला माझे एकच सांगणे आहे. त्याने त्याचे अवैध कामे बंद करावीत असं जलील यांनी म्हटले आहे.











